जर शिधापत्रिकाधारकांने ३१ ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्यांना रेशनधान्य मिळणार नाही. याशिवाय अशा शिधापत्रिकाधारकांची नावेही रेशनकार्डमधून वगळली जाणार असून त्या शिधापत्रिकादेखील रद्द केल्या जाणार आहेत.
शिधापत्रिकेत नावे असलेल्या प्रत्येक लाभार्थ्यांने आपल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई-पॉस डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक सीडिंग करून घ्यायचा आहे. अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असून ई-केवायसी पूर्ण झाल्यावरच येत्या काळात लाभार्थ्यांच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ दिला जाणार आहे.
हातकणंगले तालुक्याचे पुरवठा अधिकारी चंद्रकांत काळगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक धान्य दुकानात ई- केवायसी प्रक्रिया निःशुल्क सुरू आहे. स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीनव्दारे प्रत्येक शिधापत्रिकाधारकांनी कुंटुंबातील सदस्यांची केवायसी करून घ्यावी. आधार क्रमांक टाकून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांचे रेशन बंद होणार असल्याची माहिती काळगे यांनी दिली.
पारदर्शकतेचा उद्देश
स्थलांतरित कुटुंबांनादेखील ते वास्तव्य करत असलेल्या क्षेत्रातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी पडताळणी पूर्ण करता येणार आहे. ई-केवायसी अपटेड करण्यामागे धान्य वितरणात पारदर्शकता आणणे हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.
१ नोव्हेंबरपासून धान्य बंद होण्याची शक्यता
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत गरीब गरजूंना रेशनधान्य पुरवठा केला जातो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना सरकारने ई-केवायसीची अट घातली. योजनेतील बनावट लाभार्थ्यांचा शोध ‘ई-केवायसी’तून लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्टोंबरपर्यंत मुदत दिली आहे. ‘ई-केवायसी’ न केलेल्यांचे रेशनधान्य तसेच रेशनकार्ड १ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे.